डोंबिवली, दि. ७ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट 27 गावातील पूर्वी ग्रामपंचायत सेवेत असणारे आणि आता महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या सुमारे सहाशे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार लागू असणारे किमान वेतन मिळणार असे आश्वासन आयुक्त पी.वेलरासू यांनी दिले. आमदार सुभाष भोईर व 27 गावातील सेना नगरसेवक पदाधिकारी यांची आयुक्तांबरोबर बैठक झाली यात प्रामुख्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यासाठी चर्चा झाली.
‘ना घर का ना ….’.अशी अवस्था झालेल्या या कर्मचाऱ्यांनी 15 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचे जाहिर केले होते. आयुक्तांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत सर्वसमावेशक नियम लागू करून येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देऊन 27 गावातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
याचबरोबर 27 गावात अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत त्याबाबत या बैठकीत आमदार सुभाष भोईर यांनी आयुक्त पी वेलरासू यांना विचारणा केली. 27 गावातील महत्वाचे रस्ते तयार करण्याबाबत महापालिका प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक एमएमआरडीएकडे सादर करण्याच्या सूचना आमदार सुभाष भोईर यांनी केल्या. एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत महापालिकेला त्यांनी सांगितले. तसेच डोंबिवली औद्योगिक निवासी विभागातील अनेक रस्ते नादुरुस्त झाले असून निवासी विभागातील रस्त्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.औद्योगिक महामंडळाने महापालिकेला रस्ते हस्तांतरित करण्याचे पत्र पाठविले आहे. परंतु महापालिका निधी अभावी रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे करू शकत नसल्याने महापालिकेने औद्योगिक महामंडळाला पुन्हा पत्र पाठवून निवासी विभागातील रस्ते काँक्रीटचे केल्यानंतरच महापालिका रस्त्याचे हस्तांतरण करेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 112,113,115 भोपर नांदिवली येथील पाण्याची तीव्र टंचाई कमी करण्यासाठी उपाययोजना व या प्रभागात अन्नपूर्णा हॉटेल सोनारपाडा ते पी अँड टी कॉलनी समर्थ नगर आणि टेम्पो नाका शीळ रोड ते आनंद केमिकल भोपर रास्ता ते गजानन चौक, गावदेवी मंदिर नांदिवली या दोन जलवाहिन्या टाकण्यासाठी १ कोटी रुपये निधीचे अंदाजपत्रक असून त्यासाठी स्थानिक नगरसेवक निधीतून 75 लाख तसेच आमदार निधीतून 25 लाख देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
सदर बैठकीला कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, रुपाली रवी म्हात्रे, मा. जि. प सदस्य प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे, युवा सेनेचे योगेश म्हात्रे, परिवहन सदस्य मनोज चौधरी उपस्थित होते.