डोंबिवली : पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत जैन मंदिराबाबत आवाज उठविल्यामुळे २२ मार्च २०१७ रोजी महेश निंबाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरही पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. एक वर्ष होऊनही प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने गुरुवार रोजी दुपारी सव्वातीन वाजता महेश निंबाळकर यांनी “फ” प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित यांच्या कार्यालयात घुसून अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन केले. बुधवारी भाजपच्या नगरसेवकांनी अनधिकृत फेरीवाले व बांधकाम विरोधात ठिय्या आंदोलन केले होते. डोंबिवली विभागीय कार्यालयात रोज होत असलेल्या विचित्र आंदोलनामुळे पालिका प्रशासनाचे शहरात धिंडवडे पिटले जात आहेत.
महेश निंबाळकर यांनी कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत जैन मंदिराबाबत गेली तीन वर्षे आवाज उठविला होता. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी या विषयी पत्रव्यवहार करूनही काहीच ठोस उत्तर मिळाले नाही. उलट निंबाळकर यांना गंभीर मारहाण झाली. या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन हल्लेखोर आणि सूत्रधार यांना पकडण्यात अपयशी ठरले आहेत त्यामुळे एक वर्षानंतर अशा पद्धतीचे आंदोलन करीत आहे असे महेश निंबाळकर यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले कि, रामनगर पोलिस ठाणे, कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत जैन मंदिर आणि महापालिका कार्यालय आदी ठिकाणी प्रशासनाचा नागडेपणा सिद्ध करण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत निषेध आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. त्याबाबत संबंधित प्रशासनास पत्रव्यवहारही केला. रामनगर पोलीस ठाण्याने परवानगी नाकारल्याचे पत्र दिले. परंतु पालिका प्रशासने मला दुर्लक्षित केले. यामुळे मी प्रभागक्षेत्र कार्यालयात अशा पद्धतीने आंदोलन केले.
मुख्य म्हणजे पालिकेची शोकांतिका आहे कि पालिका प्रशासनाच्या आवारात कोणीही घुसून काहीही करू शकते याचा लेखाजोख निंबाळकर यांच्या क्रियेने सिद्ध झाला आहे. सुरक्षा रक्षक काय करीत होते याचे प्रश्न विचारले जात आहे. जबाबदार पालिका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून स्वतः निंबाळकर अर्धनग्न होतात हे कशाचे द्योतक आहे. पालिका कार्यालयात महिलावर्गासमोर एक पुरुष अर्धनग्न होतो आणि सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेतात. या कृतीमुळे पालिकेचे धिंडवडे पिटले जात आहेत. विशेष म्हणजे या वेळी महेश निंबाळकर यांचा भाऊ नंदकुमार दत्तात्रय निंबाळकर, आई मालती दत्तात्रय निंबाळकर, पत्नी धनश्री महेश निंबाळकर या घटनेची साक्षीदार राहतात ही खेदजनक घटना आहे. डोंबिवली विभागीय कार्यलयात अशा विचित्र निषेध आंदोलनाची घटना होऊन दोन तास उलटूनही जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.