पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबीर

डोंबिवली : तीर्थरूप पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औतिच्य साधून बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्व येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी नवनिर्वाचित महापौर विनीता राणे, आयुक्त गोविंद बोडके, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, मावळते महापौर राजेंद्र देवळेकर, समन्वयक मंगेश चिवटे, नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश जाधव आदी  उपस्थित होते.

कल्याणच्या आर्य गुरुकुल शाळा नांदीवली मलंग रोड येथे १३ मे रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान या शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई ठाणे येथील नामवंत हाँस्पिटल, कल्याण डोंबिवली उल्हासनगर, ठाणे शहरातील डॉक्टर संघटना, जिल्हा रुग्णालय शिबिरात सहभागी होणार आहेत. सहभागी होण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ठाणे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी जवळच्या शिवसेना शाखेत प्राथमिक नोदंणी करावी असे आवाहन खा.डॉ शिंदे यांनी केले.

पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे सहा महीन्यापूर्वी या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. यातून करोड रुग्णांना मदत करण्यात आली. आयोजित  शिबिरात १५ हजार रुग्ण भेट देण्याची शक्यता डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. कल्याण पूर्व येथे प्रामुख्याने गलिच्छ वस्ती आहे. येथील रुग्णांना अशा प्रकारची व्यवस्था मिळावी हा या शिबिरामागचा उद्देश आहे. एक कोटीपेक्षा जास्त औषधे रुग्णाकरीता उपलब्ध करून देणार आहोत.

सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या शिबीरात सर्वसाधारण आजारांबरोबरच कर्करोग, मेंदू विकार, त्वचा, नेत्र, दंत, नाक, कान, घसा संबंधी रोग, हृदय विकार व विशेषतः बालहृदयरोग अशा सर्व आजारांवर तज्ञ डाॕक्टरांकडून तपासणी, अनेक प्रकारच्या तपासण्या – चाचण्या विनामुल्य करण्यात येणार आहेत. शिबीरात येणाऱ्या सर्वांना आवश्यकतेनुसार औषधाचेही विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्यांची नियोजनानुसार वेगवेगळ्या नामांकित रुग्णालयात सरकारच्या विविध योजनांनुसार विनामुल्य शास्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.

ज्या नागरीकांना या शिबीराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत प्राथमिक नोंदणी करावी किंवा 7822080050 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करावी असे आवाहन या महाआरोग्य शिबीराचे प्रमुख आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.