डोंबिवली : विद्यार्थांतील कलागुण व त्यांच्या व्यवहार कौशल्यांना वाव मिळावा यासाठी पूर्वेकडील प्रगती काँलेजच्या माध्यमातून प्राईड आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव मंगळवार दि. 7 ऑगस्ट पासून सुरु होईल अशी माहिती प्राचार्य अशोक महाजन यांनी दिली.
प्राईड आंतर महाविद्यालयीन महोत्सवाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला उपप्राचार्य अविनाश शेंडगे, स्वाती पुसाळकर आदी उपस्थित होते. या उत्सवांबाबत अशोक महाजन म्हणाले की, सुमारे 200 महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतात. क्रिडा व कलागुणां व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील व्यावहारीक कौशल्यांचे संवर्धन होण्यासाठी विविध खेळांचे आयोजन यामध्ये करण्यात आले आहे. महोत्सवात ट्रेस इंटरव्यू, बेगबोरो स्टील, ब्लाईंड फोल्ड, रुरल ले कार्ड, प्रोडक्ट मेला, पीयुजीपी फिल्मी चक्कर, अँडमँड शो, कांउटर स्टाईक, ब्लाईंड कोडिंग सारख्या स्पर्धा अंतर्भूत आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी अशा उत्सावांचे आयोजन करण्यात येते.
विद्यार्थांच्या सर्जनशिलतेत यामुळे वाढ होते. विशेषत भाषिक शाळेतून येणाऱ्या विद्यार्थांचे शैक्षणिक मूल्यात वाढ होते. जीवनात उत्तुंग भरारी घेत असताना नक्कीच विद्यार्थांना अशा उत्सवांचा लाभ होउ शकतो. मंगळवार दि. 7 आँगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या उत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.