शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

डोंबिवली : रेल्वे न्यायालयात तब्बल एक तप चाललेल्या सुनावणीत वाद-प्रतिवादा नंतर डोंबिवलीच्या दहा शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

जानेवारी 2006 मध्ये डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे रेल्वे प्रवाशांना डोंबिवली रेल्वे स्थानकात अनागोंदी कारभार थांबवून विविध सुविधा तातडीने मिळाव्यात या मागणीसाठी रितसर निवेदन देऊन व स्टेशनमास्तर यांची वेळ घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ रेल्वे प्रवाशांसाठी न्याय मागणी करत असताना काही  रेल्वे अधिकाऱ्यांनी जमावासमोर उर्मट वक्तव्ये केल्याने बिथरलेल्या जमावाकडून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्कालीन डोंबिवली शहरप्रमुख तथा नगरसेवक तथा विद्यमान जिल्हा उपप्रमुख आणि रायगड संपर्क नेते सदानंद थरवळ, माजी नगरसेवक शरद गंभीरराव, तात्यासाहेब माने, प्रभाकर चौधरी, गोविंद कुलकर्णी, सोपान पाटील, स्मीता बाबर, मनिषा धुरी, भावना चव्हाण व मधूमती शिसोदे या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अॅड. जे. आर. प्रजापती यांनी शिवसैनिकांची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली. त्यामुळे मंगळवारी दिनांक 4 सप्टेंबर, 2018 रोजी सर्वांची सुमारे बारा वर्षांनी या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.