डोंबिवली : सोनारपाडा येथील जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात गणेश विसर्जन करण्यास संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी विरोध केला. पण स्थानिक आमदार सुभाष भोईर आणि शिवसैनिकांनी हा विरोध मोडून काढत गणपतीच्या मूर्तींचे विर्सजन महाविद्यालयाच्या आवाराच्या खदानीत केले. गेल्या तीस वर्षापासून सोनारपाडा येथील खदानीत गणेश मूर्तीचे विर्सजन केले जाते. मात्र विसर्जन पूर्वीची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते गेले असता त्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिक संतापले. त्यांनी आमदार सुभाष भोईरांच्या कानावर ही गोष्ट सांगितली. त्यामुळे ते जातीने या ठिकाणी आले. विरोध मोडून काढून नागरिकांना गणेश मूर्तीचे विर्सजन करून दिले. याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, मुकेश पाटील. युवासेना तालुका प्रमुख योगेश म्हात्रे, जितेंद्र ठाकूर इत्यादी उपस्थित होते. यासंदर्भात जोंधळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे यांना विचारले असता ते म्हणाले, गेली ३० वर्ष याठिकाणी शांततेत गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. मात्र यंदा दादागिरीची भाषा करण्यात आली. महाविद्यालयात विद्यार्थी कसे येथील अशी भाषा करण्यात आली. तसेच कोणतीही परवानगी न घेतल्याने त्यांना आता येण्यास मनाई केली. ते समजुतीने आले असते तर हा प्रश्न चिघळला नसता.