डोंबिवलीत रिक्षांना काळे झेंडे बांधून निषेध आंदोलन

डोंबिवली : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ रद्द करा ते होत नसेल तर रिक्षा भाडेवाढ मंजूर करून रिक्षा चालकांना सुखाने जगू द्या या मागणीसाठी लालबावटा रिक्षा युनियन माध्यमातून रिक्षांना काळे झेंडे बांधून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात सुमारे हजार रिक्षा चालकांनी सहभाग घेतल्याचे युनियन तर्फे सांगण्यात येत आहे.

डोंबिवली शहरात सुमारे 16 हजार रिक्षा धावातात. गल्ली तेथे रिक्षा अशी परिस्थिती असल्याने वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस होत आहे. शहरात वाहतूक शाखा पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कुचकामी ठरल्यामुळे बोजवारा उडाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच प्रवाशांना सतत तारेवरची कसतर करावी लागत आहे. भाजपा प्रणीत डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना, रिक्षा चालक-मालक युनियन, महाराष्ट रिक्षा चालक सेना, रिपल्बिकन रिक्षा चालक मालक युनियन अशा अनेक रिक्षा संघटना कार्यरत असून एकमेकात मेळ नसल्याने सर्वच बाबतीत समस्या निर्माण होत असल्याचे काही युनियनचे पदाधिकारी सांगत आहेत.

रिक्षांना काळे झेंडे बांधून निषेध आंदोलन फक्त लालबावटा युनियन करीत असून त्यांना इतर संघटनांचे सहकार्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. लाल बावटा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी आंदोलनाबाबत सांगितले कि, मागील सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2012 पासून रिक्षा चालकांना दर वाढवून दिला नाही. आजची परिस्थिती पाहता पेट्रोल, डिझेल, गॅस दर प्रतिदिन वाढत आहे. दरवाढीसाठी मागील कॉंग्रेस आणि आजच्या भाजप सरकारने रिक्षा चालकांवर अन्याय केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून निषेध नोंदवत आहोत. तर रिक्षा चालक मालक युनिनयचे सरचिटणीस शेखर जोशी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि, रिक्षा महासंघाने यापूर्वीच रिक्षा भाडेवाढ मिळण्यासाठी आंदोलन केले असून त्याविषयी पाठपुरावा सुरु आहे.