भावपुर्ण वातावरणात टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे कृत्रिम विहिरीत विसर्जन

डोंबिवली : ढोल ताशाच्या ठेक्यावर लेझिम आणि झेंडा घेऊन खेळणारे नगरवासी, टाळ मृदुंगाच्या तालावर नाचणारे भजनी मंडळ आणि गेली ९ वर्षे डोंबिवलीकरांसाठी आकर्षण ठरलेले महिलांचे विशेष पथक अशा पारंपारिक आणि शिस्तबध्द मिरवणूकीनंतर खास तयार केलेल्या कृत्रिम विहिरीत भावपुर्ण वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

मिरवणूकीत महिलांच्या लेझीम पथकाची खास बाब म्हणजे ३८ महिलांच्या पथकात अगदी इयत्ता दुसरी पासून ते साठी पार केलेल्या महिलांचा समावेश होता. महिलावर्ग आपली दिनचर्या, व्यवसाय, नोकरी सांभाळून रोज संध्याकाळी होणाऱ्या लेझीम पथकाच्या तालमीत सहभागी होत होत्या. पथकामध्ये गृहिणींबरोबरच अनेक उच्च शिक्षित आणि व्यावसायिक महिलांचाही समावेश होता. या पथकात आई मुलगी अशा एकत्र नृत्य सादर करणाऱ्या सात जोड्या होत्या. टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेल्या या पथकाचे सादरीकरण बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 69 व्या गणेशोत्सवासाठी नागालँड आदिवासी संस्कृतीची प्रतिकृती सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी हुबेहुब साकारली. लोकमान्यांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे फार कमी उरली आहेत. परंतु डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्यांना अपेक्षित असणारा गणेशोत्सवास साजरा करतो असे मंडळाचे कार्यवाह केदार पाध्ये अभिमानाने सांगतात.