भारतीय मजदूर संघ पाळणार 28 ऑक्टोबर “विरोधी दिवस”

डोंबिवली : भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा अंतर्गत ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ येथे लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदीमुळे बुधवार दि. 28 ऑक्टोबर रोजी “विरोधी दिवस” म्हणून निषेध करणार असल्याचे प्रसिद्धपत्रक जारी केले आहे. संघाच्या प्रमुख आठ मागण्यांसाठी संघ लढा देण्याच्या तयारीत असून शासनाने लादलेल्या तरतुदी मागे घ्याव्यात या मागणीसाठी रस्तावर उतरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावून तसेच फिजिकल अंतर ठेवून सरकार विरोधात निदर्शने करणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा जनरल मजदूर संघाच्या प्रकाश गाडगोळी यांनी दिली.

सदर “विरोधी दिवस” निदर्शन कार्यक्रमात भारतीय मजदूर संघातील पदाधिकारी, सदस्य तसेच कामगार आणि डोंबिवली ना. सहकारी बँक कर्मचारी संघ युनिट, कल्याण जनता सहकारी बँक अधिकारी संघ, दि अभिनव बँक अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघ ठाणे जिल्हा, आयुध निर्माणी मजदूर संघ, घरेलू कामगार संघ ठाणे जिल्हा, इन्शुरन्स वर्कर्स ऑर्गनायझेशन ठाणे, प्राथमिक शाळा संघ, निवृत्त विज कर्मचारी संघ, भविष्य निर्वाह निधी कर्मचारी युनिट आदी संघटना सहभागी होणार आहेत.

शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार कपात यासाठी शासनाच्या परवानगीची मर्यादा 300 वरून 100 कामगार संख्या करा, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट रद्द करा, स्टँडिंग ऑर्डर लागू होण्याची मर्यादा 300 कंगरसंख्येऐवजी 50 कामगार संख्या करा, संपासाठी नोटीसीची मर्यादा 14 दिवस कायम ठेवा, कायम स्वरूपाचे काम काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याची तरतूद करा, सनदी अधिकाऱ्यांना कायद्यातून सूट देण्याचे दिलेले अमर्याद अधिकार मागे घ्या, कामगार संघटना नोंदणी 60 दिवसात देण्याची कालमर्यादा निश्चित करा, महिलांना रात्रपळीत कामाला बोलविण्याचा निर्णय रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने बुधवारी जय्यत तयारी केली असून प्रत्येक शहरात विरोधी दिवस पाळून निदर्शनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेणार आहे.