महानगरपालिका परिक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे माफ करा

(भाजपा माजी स्थायी समिती सदस्य शैलेश धात्रक यांची मागणी)

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असुन या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शहरात गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्व मंडळे वर्षभर समाजोपयोगी कामे करीत असतात. तसेच शहरांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीमध्ये देखील सर्व मंडळांचे पदाधिकारी व सदस्य हिरीरीने सहभाग घेवून हातभार लावत असतात. त्याचप्रमाणे मंडळाच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांचे विभागातील गोरगरीब व गरजु नागरिकांना सहकार्य करीत असतात. मागील दोन-तीन वर्षापासुन कोरोना व अतिवृष्टी अशा कारणामुळे मंडळांची आर्थिक परिस्थिती सक्षम राहिलेली नाही. परिणामी महानगरपालिका परिक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे माफ करावे अशा विषयाचे निवेदन वजा मागणी
भाजपा माजी स्थायी समिती सदस्य शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगड यांना केली आहे.

कडोंमपा प्रभाग क्र. ६१ विष्णू नगर, डोंबिवली (प) भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पत्रात पुढे सांगितले आहे की, मंडळे सामाजिक बांधिलकी व समाजप्रबोधनाच्या उदात्त हेतूने व महापालिकेने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करून उत्सव साजरे करीत असतात. मागील तीन वर्षांमध्ये या मंडळांनी कोरोना काळात परंपरा टिकून रहावी यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. या कालावधीमध्ये त्यांना आर्थिक मदत देखील फारशी मिळालेली नाही. सर्व सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ते काम करीत असतात व यातूनच भावी
पिढी घडण्यास मदत होते.

यावर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाकडून मंडप शुल्क आकारण्यात येणार असल्याचे समजते. मागील दोन ते तीन वर्षे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे माफ करून महापालिकेच्या वतीने सहकार्य करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर वरील सर्व बाबींचा विचार करून यावर्षी देखील सार्वजनिक गणेशमंडळांना संपूर्णतः मंडप भाडे माफ करण्याबाबत निर्णय घेवून दिलासा द्यावा अशी विनंती धात्रक यांनी केली आहे.