इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे  ‘प्री-हॉस्पिटल ट्रॉमा लाईफ सपोर्ट’ प्रशिक्षण

डोंबिवली : डोंबिवली मेडिकल फाउंडेशन ऑफ आयएमएच्या अंतर्गत, इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीच्या लाईफसेव्हर्स कमिटीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी, बुधवार १८ जून रोजी डोंबिवली जिमखाना येथे ‘प्री-हॉस्पिटल ट्रॉमा लाईफ सपोर्ट’ या प्रशिक्षण सत्र पार पडले.या प्रशिक्षण कार्यशाळेत वैद्यकीय तज्ज्ञांची मदत येईपर्यंत अपघातग्रस्त अथवा जखमी रुग्णांना मदत कशी करावी याबाबत डॉ.चंद्रशेखर साठे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पालिका उपायुक्तप्रसाद बोरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, इंडियन मेडीकल असोसिएशन डॉ. विजय चिंचोले,, डॉ. मंगेश पाटे, डॉ. अर्चना पाटे, डॉ. श्रुती पत्की, नीती उपासनी आदी उपस्थित होते.

डॉ. साठे म्हणाले, अपघातग्रस्त रुग्णाच्या जखमेचे मूल्यमापन आणि तीव्रतेची ओळख कशी करावी, ट्रायाजिंग (प्राथमिकतेनुसार रुग्णांचे वर्गीकरण), प्राथमिक उपचार आणि त्यानंतर रुग्णाचे उच्च उपचार केंद्रात सुरक्षित स्थानांतर कसे करावे याची माहिती देण्यात आली.विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये उदाहरणार्थ: रस्ते अपघात, कोसळलेल्या इमारतींमधून वाचवलेले नागरिक, भाजलेले/जळीत रुग्ण, रसायन किंवा किरणोत्सर्गी पदार्थांमुळे प्रभावित झालेले रुग्ण, स्फोटजन्य दुखापती, पडणे, बुडणे, तसेच साप आणि कीटक चावणे यांसारख्या घटनांमध्ये — तज्ज्ञ मदत उपलब्ध होईपर्यंत योग्य कृती कशी करावी हे प्रशिक्षणात सांगण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत लवकर व योग्य हस्तक्षेप केल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. अशा ट्रॉमा रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी जर त्वरित व प्रभावी प्राथमिक उपचार मिळाले, तर मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व टाळता येणे शक्य होते.इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून कार्यरत असून, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, समुदायाच्या आरोग्यसेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसोबत आरोग्यविषयक सकारात्मक उपक्रमांमध्ये सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर आणि कटिबद्ध आहे असल्याचे डॉ. अर्चना पाटे यांनी यावेळी सांगितले.