( महाराष्ट्राच्या या रेकॉर्ड उपक्रमामुळे गुजरात राज्याची पिछेहाट)
डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी नवा हरित महासंकल्प हाती घेतला होता. विविध स्थानिक वृक्षांच्या प्रजाती, कंपोस्ट आणि मातीपासून बिया वापरून बियाण्याचे गोळे तयार केले. याचा उद्देश म्हणजे जनमानसात पर्यावरणीय जाणीव वाढविण्यासाठी आणि हिरव्या कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच निसर्गाशी सुसंवाद वाढविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. रोटरियन सदस्य तसेच पर्यावरणप्रेमी यांचा उदंड पाठिंबा मिळाल्याने हा रेकॉर्डब्रेक उपक्रम ठरला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झाली असून अशा प्रकारच्या उपक्रमात दोन लाख सीडबॉल तयार करून महाराष्ट्रतील रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या या रेकॉर्ड उपक्रमामुळे गुजरात राज्याची पिछेहाट झाली आहे.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्या माध्यमातून केडीएमसी ग्राउंड येथील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृह येथे ‘सीड बॉल’ तयार करण्याच्या भव्य उपक्रम काल शनिवारी आयोजित केला होता. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, राजेश मोरे,कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकृत प्रतिनिधी सीमा माणिककोठ, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अध्यक्ष अध्यक्ष माधव सिंग, सेक्रेटरी चक्रपाणी शुक्ला, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कार्यकरी अभियंता रोहिणी लोकरे, दिनेश मेहता, रमेश खरमाळे, रोटरी क्लब सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, आपलं पर्यावरण, आपली जबाबदारी आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जागरूक असणं गरजेचं आहे. आजचा प्रत्येक सीड बॉल उद्याचा वृक्ष होईल, सावली देईल, प्राणवायू देईल.आपण सगळे मिळून हरित क्रांतीचा भाग होऊया.
एका संस्थेने एकाच वेळी बनवलेले जास्तीत जास्त बियाणे गोळे या विक्रमांचे निकाल जाहीर करताना विशेष आनंद होत आहे. कारण एका संस्थेने एकाच वेळी बनवलेल्या जास्तीत जास्त बियाणे गोळ्यांचा विक्रम महाराष्ट राज्य डोंबिवलीतील रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्वने स्थापित केला आहे असे
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकृत प्रतिनिधी सीमा माणिककोठ यांनी सांगितले.
सदर दोन लाख सीडबॉल नैसर्गिक परिसरात, पावसाळी घाटांमध्ये, मोकळ्या जागांत, टेकड्यांवर आणि इतर निर्जन परिसरांत विखुरण्यात येणार आहेत. यामध्ये खैर, साग,बहावा, वड, शिवण यांसारख्या स्थानिक वृक्षांच्या बियांचा समावेश आहे. सीडबॉलमध्ये माती, सेंद्रिय कंपोस्ट आणि बीज असे साहित्य असल्याचे मदन सिंग यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे सदस्य, स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवक आदीचा मोठा सहभाग होता. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष माधव सिंग, सेक्रेटरी चक्रपाणी शुक्ला, डॉ.महेश पाटील, विजय घोडेकर, चंद्रशेखर शिंदे, राकेश मेहता, श्रीरंग मानकामे यांनी विशेष मेहनत घेतली.