शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : डोंबिवली महिला महासंघाच्या सत्कार सोहळ्यात नगरसेविकांची ग्वाही

शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध :

डोंबिवली : केडीएमसी परिक्षेत्रातील विकासासाठी नागरिकांची साथ घेत कार्य करत राहू अशी ग्वाही शहरातील नवनिर्वाचीत नगरसेविकांनी दिली. डोंबिवली महिला महासंघातर्फे महिला दिनाचे औचित्य म्हणून शहरातील नवनिर्वाचीत नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या परिसंवादामध्ये सहभागी नगरसेविकांनी प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली.

आयोजित परिसंवादामध्ये नगरसेविका खुशबू चौधरी, रंजना पेणकर, ज्योती मराठे, आर्या नाटेकर, ॲड. कविता म्हात्रे, मंदा म्हात्रे, रसिका पाटील, रविना माळी आदी सहभागी झाल्या होत्या. महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष आणि कार्यवाह सीए जयश्री कर्वे यांनी या परिसंवादामध्ये नगरसेविकांबरोबर संवाद साधला. यामध्ये प्रभागातील अनधिकृत बांधकामांपासून फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत नगरसेविकांनी आपापली मते व्यक्त केली. त्याचप्रमाणे महानगरपालिका शाळांमध्ये सुधारणा कशा करता येतील याचा तपशीलवार आढावा सादर केला. प्रभागामध्ये काम करतांना लोकसहभाग कसा वाढवता येईल यावर प्रकाश टाकण्यात आला. याचबरोबर महिलांना सक्षम करण्यासाठी उद्योग निर्मितीबाबत काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशस्त रस्ते, पथदीप, फुटपाथ या सुविधांसोबत स्वच्छ आणि सुंदर बागा, वाचनालय आणि अभ्यासकक्षासाठी प्रयत्न तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयी सुविधा करण्याबाबत कटीबद्ध असल्याचेही या नगरसेविकांनी सांगितले. डोंबिवली महिला महासंघाच्या माध्यमातून उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला सुनीति रायकर, रिटा ठक्कर, जोया पाटील, ॲड. तृप्ती पाटील, ॲड. मनिषा तुळपुळे, संगिता देशपांडे, पूजा तोतला, सई बने, ललिता छेडा, आरती मुनीश्वर, मीना गोडखिंडी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा महिला व बाल विभाग संरक्षण अधिकारी निकिता साबळेही आवर्जून उपस्थित होत्या. सदर सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डोंबिवली महिला महासंघाच्या अध्यक्षा डॉ. विंदा भुस्कुटे होत्या. त्यांनी सर्व महिला नगरसेविकांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपले शहर, आदर्श शहर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं कामाला लागावे, असे आवाहन केले.