बांधकाम कामगार मुलांची उंच भरारी : नाका कामगारांचा मुलगा आणि मुलगी झाले डॉक्टर

( महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेने केले कोडकौतुक )

डोंबिवली : एक बांधकाम कामगार रोज विटावर विटा रचित आपले आयुष्य जगत असतो. मात्र काम करिताना त्याचा उद्देश असे जीवन आपल्या मुलांवर येऊ नये असे असते. आपल्या मुलाने उच्च शिक्षित होऊन समाजात वेगळे स्थान मिळवावे यासाठी झटत असतो. असा प्रत्यक्ष अनुभव डोंबिवलीतील कामगाराचे कणखर नेतृत्व, कामगारांचे प्रेरणास्थान तथा महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांना आला. त्यांनी त्या कामगार माऊलीचे अभिनंदन करून आनंदाची मिठी मारली. ते आहेत एका एमबीबीएस डॉक्टर झालेल्या मुलाचे तसेच डॉ. मुलीचे वडील प्रभाकर खरात.

गरिबीमुळे खरात दांपत्याला आपल्या शिक्षणाची आवड पूर्ण करता न आल्याने त्यांनी त्यांच्या मुलांना उच्चशिक्षित केले. आईवडिलांची इच्छा कमी साधने असताना मुलांनीही ती पूर्णत्वास नेली. आज दोन्ही मुलं डॉक्टर असून सामाजिक बांधिलकी जपत वडिलांच्या कर्तृत्वाची पताका चारी दिशा फडकावत आहे. शिक्षणाने जग जिंकता येते यावर खरात कुटुंबाचा विश्वास आहे. कोणतेही क्षेत्र निवडा पण उच्चशिक्षित व्हा असा संदेश एकूण कामगार वर्गाला हे कुटुंब देत आहेत.नुकतेच प्रभाकर खरात यांची मुलगी डॉ. ज्योती प्रभाकर खरात यांच्या माऊली क्लिनिक दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र जनरल मजदुर संघटना माध्यमातून अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी दोन्ही डॉक्टरांचे आणि खरात पतिपत्नीचे कौतुक केले.

यावेळी डॉक्टर रामचंद्र खरात यांनी संपूर्ण आयुष्याचा चलचित्रपट समोर मांडला.डॉक्टर खरात म्हणाले, गरिबी ही माणसाची ओळख नसते, तर संघर्षातून उभं राहण्याची ताकद असते. हे मला माझ्या आई-वडिलांकडून शिकायला मिळालं. माझं बालपण अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत गेलं. घरात अनेक अडचणी होत्या, पण शिक्षणाबद्दलची जिद्द आणि प्रामाणिक मेहनत कधी कमी पडली नाही.माझे वडील मजुरी करत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे. उन्हातान्हात दिवसभर कष्ट करून त्यांनी घर सांभाळलं. अनेक वेळा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे उभे केले. त्यांच्या मेहनतीकडे पाहताना मनात नेहमी वाटायचं की, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आणि त्यांच्या कष्टाचं चीज करायचं. वडिलांचा संघर्ष, प्रामाणिकपणा आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा ठरली.माझी आईसुद्धा तितकीच खंबीर होती. तिने शिकवण्या घेणं, शिवणकाम करणं अशा अनेक मार्गांनी घराला हातभार लावला. दिवसभर काम करूनही मुलांच्या शिक्षणाकडे तिने कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. शिक्षण हाच आयुष्य बदलण्याचा मार्ग आहे, हे ती नेहमी सांगायची. तिच्या त्या शब्दांनी आणि त्यागाने माझ्या मनात शिक्षणाविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. आईने दिलेले संस्कार, शिस्त आणि सकारात्मक विचार यांनीच मला सतत पुढे जाण्याची ताकद दिली.घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे अनेक वेळा अडथळे आले, आर्थिक संकटं आली, पण आई-वडिलांनी कधी माझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. त्यांचा विश्वास आणि पाठिंबा यामुळेच मी प्रत्येक संकटाला सामोरं गेलो. अभ्यास करताना अनेकदा परिस्थिती प्रतिकूल होती, पण डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र कायम डोळ्यासमोर होतं. अखेर मेहनत, चिकाटी आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी एम बी बी एस पूर्ण केलं आणि पुढे इमर्जन्सि मेडिसिन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. विशेष बाब म्हणजे माझी बहिणही डॉक्टर झाली त्यामुळे आनंद अधिक द्विगुणित झाला.

तर लक्ष्मण मिसाळ यांनी दोन्ही डॉक्टर भाऊ बहिणींचे कौतुक करताना सांगितले की, आमच्यासाठी ही बाबा अभिमानाची आहे. आमचे मित्र प्रभाकर खरात हे 1979 डोंबिवलीत आले आणि त्याकाळी काम मिळत नव्हतं आणि काम मिळाल्यानंतर कामाचे पैसे मिळत नव्हते परंतु त्यांनी त्या एवढ्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले मुलं शिकवले आणि नुसते शिकवलेच नाही तर त्यांना उच्च शिक्षण देऊन मुलांना डॉक्टर केले. नाक्यावरती काम करणारा सहकारी आणि त्याची मुलं एवढे उच्च शिक्षण झाले मी माझ्या सर्व कामगार बांधवांना नम्रपणे विनंती करतो की प्रभाकर खरात यांच्या मुलांचा आदर्श घेऊन प्रत्येक कामगारांनी आपले स्वतःचे मुलं उच्च शिक्षित करावी.कामगारांनी आपले मुलं उच्च शिक्षित करा घरामध्ये काटकसर करा मुलांना शिक्षणासाठी चांगले शिक्षण द्या त्यांच्या शिष्यवृत्तीचे काही प्रश्न असतील तर ते संघटनेची संपर्क करा त्यांच्या शिक्षणासाठी आपण सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा करून त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देऊ परंतु एकही कामगारांचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो.