( धोकादायक इमारतीत बसतात कर्मचारी )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालय हे चार पाच वर्षापासून अतिधोकादायक इमारत घोषित आहे. येथील बहुतेक कार्यालये दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आली आहेत. मात्र कामगारांच्या जीवाला हलके समजून याच इमारतीच्या तळमजल्यावर पालिकेने सहायक आयुक्त यांचे रिकामे केलेल्या कार्यालयात आपत्तकालीन कक्ष बनवले आहे. काही दिवसापासून या कक्षात कामगार भीतीच्या छायेखाली आहेत.
जुने झालेले छताचे प्लास्टर कोसळल्याने या कक्षात आपातकालीन विभाग कर्मचारी येथे बसताना जखमी होण्याची दाट शक्यता आहे. पालिका प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याने, प्रशासन कर्मचारी जखमी होण्याची प्रतिक्षा करत आहे का असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. पालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतील राहिवाशांना त्यांची घरे रिकामी करून अशा इमारतीत येऊ दिले जात नाही. मात्र पालिका प्रशासनाची हि तत्परता डोंबिवलीतील अति धोकादायक इमारतबाबत दिसत नाही. पालिका अधिकाऱ्यांना बसण्याकरता इतर इमारतीत सोय करण्यात आली. मात्र आपतकालिन कक्ष याच इमारतीच्या तळमजल्यावर केला आहे. पालिका आयुक्त व उपायुक्त यांच्यापासून हि वास्तविकता सहायक आयुक्त यांनी का लपविली असा प्रश्न कर्मचारी वर्गाला पडला आहे.

या कक्षात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी म्हणून ढोल बडविणाऱ्या व नागरिकांना स्वच्छतेचे धडे शिकवताना पालिका प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्याच्या जीवाशी व आरोग्याशी खेळत असल्याचे या परिस्थितीवरून दिसून येते. पालिका लोकप्रतिनिधीनी यावर आवाज उठवल्यास भविष्यात होणारा धोका टळू शकतो असे आता नागरिक म्हणत आहेत.
