महावितरण कंपनीचा गोंधळात गोंधळ
…अबब सामान्य वीज ग्राहकाला तीन लाख विद्युत बिल
डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : महावितरण आणि वीजग्राहक यांच्यात वाद न झाला असा एकही दिवस नाही. डोंबिवली जवळील काटई येथील एका नागरिकाला जून २०१७ महिन्याचे वीज बिल चक्क तीन लाख रुपये पाठविले गेले. यापूर्वी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा नगर येथे राहणारा नाका कामगार राजू शिंदे यांना एका महिन्याचे ६२ हजार रुपये वीज बिल देण्यात आले होते. `फोल्टी मीटर` असे वीज बिलात लिहून आपली जबाबदारी झटकणाऱ्या या कंपनीने दिलेल्या या शॉकमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. आमदार सुभाष भोईर यांनी याकडे लक्ष देत नागरिकांना योग्य वीज पाठविणे महावितरण कंपनीची जबाबदारी असून लवकरच यात सुधारणा करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
वीज बिल आणि महावितरण कंपनीच्या संबधित समस्याचे निवारण करण्यासाठी `महावितरण आपल्या दारी` कार्यक्रम आज पिंपळेश्वर मंदिरात पार पडला. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर नागरिकांच्या भेटीला आले होते. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी नगरसेविक रवी पाटील, माजी सरपंच मुकेश पाटील, युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे, मुकेश भोईर यासह अनेक शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. डोंबिवली जवळील काटई येथे राहणारे मुकुंद दत्तू पाटील यांना जून २०१७ चे वीज बिल ३ लाख सहा हजार तीनशे सत्तर रुपये पाठवण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेले महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काकडे, कार्यकारी अभियंता के. एस.बेल्ले उपस्थित होते तेव्हा त्यांच्या कामाची लक्तरे सर्वांसमोर उघड झाल्याने लोकप्रतिनिधी समोर लाखोली ऐकावी लागली.
याबाबत असे की, मे २०१७ रोजी पाटील यांच्या वीज बिल ४५० रुपये आणि ८७ युनिट पडले होते. मात्र दुसऱ्या महिन्यात म्हणजे जून २०१७ ला ३ लाख सहा हजार तीनशे सत्तर रुपये वीज बिल आणि १८,७८३ युनिट पडल्याचे वीज बिलामध्ये दाखवण्यात आले आहे. मे महिन्याच्या वीज बिलामध्ये `फोल्टी मीटर` असे लिहून महावितरण कंपनीने आपली हुशारी दाखवली. प्रत्यक्षात याची जबाबदारी त्या वीजग्राहकावर टाकली गेली. अश्या प्रकारे `मीटर फोल्टी`लिहून जास्तीचे वीज बिल पाठवून कंपनी ग्राहकांची लुट करत असल्याची ओरड सुरु झाली आहे.
चौकट :
तुमचे मीटर फोल्टी आहे, मिटर तपासण्यासाठी कार्यालयात तुमचे मीटर घेऊन या, मीटर तपासणीसाठी १०० रुपये दर आकराले जाते` असे उत्तर दिले जाते. वास्तविक `फोल्टी मीटर` तपासण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असून त्याचा भुर्दंड मात्र नागरिकांना सहन करावा लागवा अशी विचारणा होत आहे