डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : मुजोरपणा करणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षाचालकांमुळे अनेक वेळेला वाहतूक कोंडीला सामना करायला लागणाऱ्या पूर्वेकडील इंदिरा चौकात आज रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
रिक्षा चालकांच्या अरेरावीपणा विरोधात अने तक्रारीमुळे डोंबिवलीकरांनी एकत्र येऊन `प्रोटेस्ट अगेस्ट रिक्षावाला` असा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमधील सदस्यांनी वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परीवहन विभागाकडे रिक्षाचालकांवर कारवाई होण्यासाठी निवेदन देण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून वाहतूक पोलिसांनी पूर्वेकडील इंदिरा चौक आणि पश्चिमेकडील कोपर ब्रिजजवळ रिक्षाचालकांवर कारवाई केली. यावेळी अनेक रिक्षाचालक नियमांचे उल्लघन करत असल्याचे निदर्शनात आले. या कारणाने डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे, रामनगर पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि ईगल ब्रिगेड संघटनेचे सदस्य यांनी एकत्रितपणे कारवाई केली. यावेळी ईगल ब्रिगेड संघटनेचे सहकार्य मिळाल्याची चर्चा होती. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत युनियनची बोलकी प्रतिक्रिया.
संजय देसले
(अध्यक्ष – डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना)
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई झालीच पाहिजे. अशा रिक्षाचालकांना आमची युनियन कधीच पाठीशी घालणार नाही. मात्र सर्वच रिक्षाचालक मुजोर नसतात. प्रामाणिकपणाने रिक्षाचालविणारेपण रिक्षाचालक आहेत. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी करत असलेल्या कारवाईला आमच्या युनियनचा पूर्ण पाठिंबा आहे.