डोंबिवलीत श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

डोंबिवली : पश्चिमकडील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घन:श्याम गुप्ते रोडवरील बाळकृष्ण अपार्टमेंटसमोरील भव्य मंडपात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामनवमीला सकाळी श्री राम जन्माचे ह.भ.प. परुळेकर यांचे कीर्तन झाले. कीर्तन झाल्यावर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी यावेळी पाळणा म्हटला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गेली चौदा वर्षे श्री रामनवमी उत्सव साजरा केला जातो. भाविकांना सुंठवडा, पेढा प्रसाद आणि थंडगार पन्हे देण्यात आले. सदर श्रीराम नवमी उत्सव यशस्वी करण्यासाठी अनुप केतकर, संतोष मुठ्ठल, विनायक करंदीकर, पवन पाटील, विनोद म्हात्रे, शैलेश दरगुडे, संदीप गवाणे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी नगरसेविका विद्या म्हात्रे, भाजपाचे जेष्ठ नेते पद्माकर कुलकर्णी, प्रज्ञेश प्रभुघाटे, दिनेश जाधव, राजेश म्हात्रे, सीताराम कदम, प्रमोद महाजन, शेखावत, मीनल गावडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच पूर्वेकडील रामनगर विभागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे राम मंदिरात, चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव साजर झाला. श्री हरी स्वामी समर्थ सेवा मंडळ संचालित गोविंदानंद श्रीराम मंदिरात, पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून सुंठवडा प्रसाद दिला. “राम जन्मला ग सखे राम जन्मला” हे भजन म्हटले. दिवसभर श्री रामाचा पाळणा दर्शनासाठी ठेवला होता. श्री गणेश मंदिर संस्थान येथे सकाळी महापूजा होऊन सकाळी १० ते १२.३० रामजन्म कीर्तन आणि राम नाम जप समाप्ती झाली. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये राम नामाचे महत्व सांगणारी भजने सुरु होती. राम नाम गाण्यामुळे ठिकठिकाणी वातावरण भक्तिमय होते.