( ठाकूर यांनी घेतला खासदार मित्र डॉ. शिंदे यांच्या घरातील मोदकाचा आस्वाद )
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. डोंबिवलीत त्यांचे भाजपा तर्फे जंगी स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सद्यस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे शिंदे सरकार आल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश होता. दरम्यान ठाकूर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवली निवासस्थानी भेट दिली त्यावेळी ठाकूर यांनी खासदार डॉ. शिंदे यांच्या घरातील मोदकाचा आस्वाद घेतला. महाराष्ट्रात यापूर्वीही मोदक खाण्याचा योग आला होता पण मित्राने दिलेला मोदक खूप गोड आहे असे म्हणताच हशा पिकला.
डोंबिवलीत विकोनाका येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, कल्याण डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघाची 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी व मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री ठाकूर यांचा आढावा दौरा सप्टेंबर 11, 12 आणि 13 असा तीन दिवसांचा आहे. या दरम्यान ते डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथमध्ये पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच धार्मिक, सामाजिक संस्थांना भेट देणार आहेत.
तर याबाबत नामदार रवींद्र चव्हाण सांगितले की, शेवटच्या नागरिकापर्यंत सरकार पोहोचले पाहिजे. सरकारच्या योजना भाजपा कार्यकर्त्याने स्वयंप्रेरणेने लोकांपर्यंत प्रसारित केल्या पाहिजेत या विषयी अनुराग ठाकूर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणार आहेत.
तर डॉ. शिंदे यांनी सांगितले की, 2024 मधील कल्याण मतदार संघात भाजपा आणि खरी शिवसेना यांच्या युतीचा उमेदवार मीच असणार. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. पक्षवाढ करणे प्रत्येक पार्टीचे काम असते. भाजपा त्याच पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे वेगळ्या दृष्टीने पहाण्यात अर्थ नाही.