डोंबिवलीत आण्णा भाऊ साठे चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जल्लोष

डोंबिवली : शिवसेनेत उद्धव गट आणि शिंदे गट अशी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मूळ चिन्ह धनुष्यबाण गोठविला. आता दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी निशाणी मिळणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव आणि निशाणी म्हणून मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यांना अपेक्षित असलेले मशाल चिन्ह मिळाल्याने डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांनी कल्याण रोडवरील आण्णा भाऊ साठे चौकात जल्लोष केला.

पूर्वेकडील पाथर्ली विभागातील कल्याण रोडवरील आण्णाभाऊ साठे चौकात शिवसेनेने पूर्वी मशालस्तंभाची उभारणी केली आहे. तत्कालीन नगरसेवक तात्यासाहेब माने यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून या मशाल स्तंभाचे बांधकाम केल्याची माहिती दिली. याबाबत तात्यासाहेब माने यांनी सांगितले की, या मशाल स्तंभाचा उद्देश असा होता की, या क्रांतिकारक मशालस्तंभाला नतमस्तक होऊन कोणत्याही आंदोलनाचा सुरुवात होत असे. सन 2004 रोजी तत्कालीन नागरसेवसक तात्यासाहेब माने यांच्या नगरसेवक निधीतून हे काम केले होते. त्याच मशालस्तंभाला साक्षी ठेवून शिवसैनिकांनी मशाल चिन्ह मिळाल्याने जोशपूर्ण जल्लोष केला. मंगळवारीही जेष्ठ शिवसैनिकांनी मशालस्तंभाचे पूजन करून शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिक मंगला सुळे, तात्यासाहेब माने, संदीप नाईक, प्रमोद कांबळे, सतीश मोडक यांच्यासह परिसरातील बालसैनिकांनीही जल्लोषात सामील झाले.