( कैलास लस्सी-भाजी मार्केट परिसर झाला फेरीवाला मुक्त )
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम बाहेरील स्टेशन परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त परिसर आहे. आता डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील कैलास लस्सी पासून पुढील १५० मीटर परिसर फेरीवाला मुक्त होण्यासाठी शुक्रवारी कारवाई केली परिणामी हा परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त झाला. शुक्रवारी ‘फ’ प्रभागक्षेत्र सहायक आयुक्त भरत पाटील यांच्यासह पथकातील कर्मचारी यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली. यामुळे स्टेशन परिसरात नागरिकांना चालण्यास अडचण येत नव्हती.
संध्याकाळी पथकप्रमुख मिलिंद गायकवाड यांसह कर्मचाऱ्यांनी स्टेशन बाहेर 150 मीटर अंतराच्या आत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. यामुळे कामावरून परत घरी असलेल्या डोंबिवलीकरांना चालणे सुलभ झाले होते. फेरीवाले फुटपाथवर बसलेले दिसत असल्याने प्रशासनाच्या नावाने नागरिक बोटे मोडत असल्याने तात्काळ अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.
याबाबत सहायक आयुक्त भरत पाटील यांनी सांगितले शुक्रवारी सकाळपासून पथकातील कर्मचारी स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करत आहेत. त्यांना कडक कारवाई करा असे निर्देश दिले आहेत.