पश्चिमेतील स्मशानभूमीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन !

डोंबिवली : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पश्चिमला ही पालिकेच्या देखरेखीखाली अद्ययावत स्मशानभूमी व्हावी अशी पश्चिम डोंबिवलीकरांची जुनी मागणी आहे. खासदार डॉ. शिंदे मूलभूत आणि पायाभूत सुविधेसाठी नेहमीच लक्ष देतात. खासदारांनी पश्चिम डोंबिवलीसाठी नोंदणीकृत स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी जुनी डोंबिवलीचे जेष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी केली. या मागणीला खासदार शिंदे यांनी होकार दिला असल्याने आता अनेक वर्षांपासूनची जुनी डोंबिवलीकरांची समस्या निकाली निघणार आहे.

शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी शहरातील गल्लोगल्ली सिमेंट काँक्रीट रस्ते आणि त्याचबरोबर मुख्य रस्ते काँक्रीटीकरण करण्यावर शिंदे यांनी भर दिला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यांच्या मंत्रालयामार्फत काँक्रीटीकरण रस्त्यासाठी वेगळा निधी दिला असल्याने आता शहरात सगळीकडे रस्ते चकाचक करण्यावर भर दिला जात आहे. रविवारी काँक्रीटीकरण कामाच्या रस्त्याच्या शुभारंभ डॉ. नेमाडे गल्ली, जुनी डोंबिवली येथे पार पडला त्या कार्यक्रमात डॉ. शिंदे यांनी येथील स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.

जुनी डोंबिवली येथील रेल्वे स्टेशनजवळील जोंधळे चौक ते जुनी डोंबिवली गांव रेल्वे अंडरपास अशा काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर विनिता राणे, गोपाळ लांडगे, भाऊसाहेब चौधरी, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, रणजित जोशी, वृषाली जोशी, अजय पांचाळ, आत्माराम नाटेकर, भाजपचे शशिकांत कांबळे, राहुल दामले, कृष्णा पाटील, समीर चिटणीस आदी उपस्थित होते.

पश्चिम विभागात विचार करता इतर सर्व रस्ते यापूर्वीच काँक्रीटीकरण माध्यमातून झाले आहेत. जुनी डोंबिवली रस्त्याकडे पालिका प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील लोकप्रतिनिधी करीत असतात. त्यामुळेच मागील दोन वर्षे विश्वनाथ राणे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे या जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी पाठपुरावा केला. अखेर शिंदे यांनी या रस्त्यासाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळवून दिला आणि त्यामुळेच हा रस्ता आता काँक्रीटचा होणार असून इतर चालण्यासाठी पदपथ अशा सुविधा मिळणार आहेत. मुख्य म्हणजे आता पावसाळ्यात आता रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत आणि रस्ता सुरळीत होणार असल्याचे वाहतूक कोंडी होणार नाही.

आता रस्त्याबरोबर स्मशानभूमीसाठीही खासदार डॉ. शिंदे यांनी होकार दिल्याने येथील लोकांची यातायात कमी होईल. अंत्यविधीसाठी जुनी डोंबिवलीकरांना पुर्वेतील एकमेव रामनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमीचा वापर करावा लागतो. हे अंतर खूप मोठे असल्याने याचा त्रास होतो. शिवाय कोपर उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होत असल्याने अनेकवेळा अंत्ययात्रा थांबवून ठेवावी लागते. जुनी डोंबिवली येथे पालिकेच्या माध्यमातून जर सुविधा आणि नोंदणी तसेच साहित्य उपलब्ध झाले तर हा तासोनतासाची समस्या मार्गी लागेल. डॉ. शिंदे यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे येथील नागरिकांचा विश्वास दृढ झाला असून आता सर्व सुविधा मिळणार असल्याने लोक समाधानी आहेत. असे असले तरी विश्वनाथ राणे यांनी यासाठीही रस्त्यासारखाच पाठपुरावा करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.